शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११

माझ्यातली 'मी'.....एक आई....!!

                     माझ्यातल्या 'मी' ला कुठे हरवलेय मी...कौतुकापोटी की गरज म्हणुन...स्वतःवर लादून घेतलेल्या जबाबदा-या, बंधनं...सगळच हसत सहन करत आले मी..मला आवडायचे फुलपाखरांचे रंग...त्याचं उडणं.. हिरव्यागार झाडांचा वास...मातीचा गंध...पण इथे तर फक्त सगळीकडे फोडणीचेच वास...मुलांचा कलकलाट..भांड्याचा गोंधळ...सगळं हवंही होतं आणि नकोहि...चाकोरीबाहेर जाण्याचं मोठं आकर्षण...परंपरा संभाळण्याकडे असलेला कल...डोळ्यांत काजळ घालायचं होतंही आणि ते घातल्यावर आपल्या दृष्टीसीमेला बंधनं घातली जातील कि काय अशी भीतीही वाटत होती...मुक्त वागायचं होतं...स्वैर राहायचं होतं...पण माझ्या मनाला उडता येत नसावं बहुतेक...माझं मन स्वच्छंदी नव्हतं....पण मग कुणाला स्वैर, स्वच्छंदी राहायचं होतं..?
                   
                     सगळ्यांना ओरडून सांगावसं वाटताना कुणीतरी मौनाचं महत्त्व समजावत होता...घुसमट होत होती...श्वास कोंडत होता...पण जाणार कुठे..?
या सगळ्यात एकच गोष्ट मनासारखी...कौतुक्...भरपुर कौतुक...पण आजकाल मन तिथेही संशयी...कौतुक कि नकळत घेतला जाणारा फायदा..?....काहिच कळत नाहि.....
                       

                     मी कोण आहे..?.. नात्यात गुरफटलेली बंदिस्त स्त्री...कि घर आणि ऑफिस संभाळणारी एक स्वतंत्र व्यक्ती...मी नक्की यशस्वी होते...यशस्वी म्हणजे नेमकं काय...त्या टोमण्यापासुन दूर जाणं म्हणजे यश...
मी कोण होते...आणि नेमकी मी काय होते..काहिच कळायला मार्ग नव्हता...लोकांच्या मते मी कुणाच्या बाळाला घ्यायचं नाही...पण का?

                     माझ्यातल्या 'मी' चं माझ्याचबरोबर भांडण...
                    ती म्हणत होती...''उठ...बाहेर पड...धुडकाऊन लाव सगळ्यांना...सगळ्या बंधनांना...मोकळी हो...''
                     मग मी म्हणायचे....'' अगं हे सगळं तूलाच तर हवं होतं...तूच म्हणाली होतीस ...तू सगळं करू शकतेस..मग आता का मागं फिरतेस...एकटी राहू शकतेस का?''
                    इथे तरी काय आहे....मोकळं आकाश...कि नुसताच पोकळ ध्वनी...समोर अंधार...मोकळं, वांझोटं गर्भाशय...सगळं असुन नसल्यासारखं...
                  
                    पण काहितरी दिसतंय...तांबुस गोळा....माझे रीती ओंजळ भरून गेली....
                   
                    पांढ्-या पायाची पोर....जन्मतःच आईला गिळुन टाकलं....
खरंच तीचे पाय पांढरे होते...गोडंस,गुबगुबीत...दुध भरलेल्या फुग्यासारखे...दत्तक घेतला तीने माझा सगळा वांझोटा अंधार....



माझं बाळ...मी पूर्ण झाले होते...

असं दुस-याचं बाळ द्त्तक घेउन कुणी आई होतं का...?

पण माझ्यातलं मातृत्व वांझोटंपण झटकून नव्याने जन्माला आलं होतं...

माझ्यातली मी सापडले होते मलाच....

कोण होते मी....माहित आहे...

एक आई....फक्त आई...



मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

वॉशिंग मशिन यात्रा...!!!

                         माझी आई म्हणजे जरा वेडछापच आहे...छोट्या छोट्या गोष्टींसाठी घाबरत असते..मी काय लहान आहे का आता..वर्षांचा होईन थोड्या दिवसांनी..ह्याला हाथ लावू नको..त्याच्यावर चढू नको... हे खाऊ नको...काय आहे यार्...सुखाने जगू देत नाहित हे मोठे लोक.. हि आई तर नुसती किरकिर करत असते...पण प्रेम पण तेवढंच करते माझ्यावर...रात्री तिच्या कुशीत झोपायला खूप खूप आवड्तं मला...ती सकाळी ऑफिसला जाते तेव्हा खूप रडायला येतं मला..सुट्टी असली कि ती खूप खेळते माझ्याबरोबर्...मला ती खूप आवड्ते...मी एखादी नवीन गोष्ट केली कि तीला खूप कौतुक वाट्तं माझं...सतत काहीतरी करायला सांगत असते..भंडावून सोडते अगदी.. नाक कुठे आहे...दात दाखव...'आई' बोल ना... नाचुन दाखव...असं काहीही.....वेडछाप...

                         रविवारी बाबांनी मला सलून मधे नेलं...सलून जिथे एक काका ब-याच काकांचे केस कापत असतात आणि हो दाढी पण करतात..माझेही केस कापले..अक्षरशः गोटाच..पहिल्यांदा आरशात बघायला कसंतरी वाटलं...पण खूप हलकं हलकं वाटत होतं...माझ्या गोट्या रूपाचंहि आईला भारी कौतुक..नेह्मीसारखं भरपूर फोटो काढले....



                            मला "आई" बोलता यायला लागलं त्यादिवशी तर आईने मस्त खीर बनवली होती...आणि दिवसभर मला किती वेळा ''आई'' बोलायला लावलं होतं..अश्या खूप गोष्टी ज्या मला क्षुल्लक वाटतात...त्याचं तीला प्रचंड कौतुक असतं...मला आलेला पहिला दात्...मी म्ह्टलेला पहिला शब्द...मी मागच्या महिण्यातच चालायला लागलो...आई तर इतकी आनंदली (तसं पण तिला ओव्हर रीअ‍ॅक्ट व्हायला काहिहि कारण पुरतं )...तीने त्यादिवशी दही भात आणि शि-याचा नैवेद्य दाखविला बाप्पाला...बाप्पाची मजा आहे बुवा...चालायला लागलो आम्ही...आणि खाऊ मिळाला बाप्पाला...
                        पाय फुटल्यावर पाहिल्यांदा सर केला तो सोफा..उंचीला कमी त्यामुळे सहज चढून गेलो...आई दिवसभर आल्या गेल्याना सांगत होती...'' वर्ष पूर्ण व्हायच्या आतच पाय फुट्ले हो माझ्या बुबुड्याला..''

                           सोफ्यानतंर माझं टार्गेट होतं बेड...बेडवर चढणं तितकसं अवघड नव्ह्तं...कारण आईचं पुस्तकाचं कपाट बेडला जोडलेलं आहे..त्याच्यावर चढलं कि दूसरा पाय बेडवर्...आता मला बेडवरून उतरण्यासाठी रडावं लागत नाहि...आता वॉशिंग मशिन तेवढं राहिलं होतं...कपडे धुताना धडधडणा-या मशिनमधे नेमकं काय असावं?...आज ठरवलंच होतं कि वॉशिंग मशिन सर करायचीच...आई पोळ्या करत होती.. हि चांगली संधी होती...ती मला कुठलं तरी गाणं शिकवत होती...मी हळूच पाठीमागुन सटकलो...मला फक्त वॉशिंग मशिन दिसत होती..बेडला चिकटवून ठेवलेली वॉशिंग मशिन...मी सगळ्या स्टेप मनात ठरवूनच ठेवल्या होत्या..पहिल्यांदा आईचं पुस्तकाचं कपाट पार करायला ह्वं होतं..आज योगायोगाने ते उघडं होतं...मी आतल्या पुस्तकाच्या ढिगावर उतरलो...आपली वेडछाप आई एवढी पुस्तकं कधी वाचते..?..मी पुस्तकाच्या ढिगावरून सरळ बेडवर चढलो....वॉशिंग मशिनपर्यंत पोहचलो खरा पण मशिनचं झाकण काही केल्या उघडेना...शेवट्चा प्रयत्न करावा म्ह्णून जोर लावला तर ते उघडलं गेलं...मग काय उतरलो सरळ मशिनमधे...आतमधे नाचुन बघितलं...बसून बघितल....पण या मशिनचे कपडे धुणारे हात कुठे दिसलेच नाहित...


'' बूब्बू...बूब्बू...कुठे आहेस तू? आवाज का देत नाहिस...बूब्बू..."

                            हा तर आईचा आवाज होता......आई पुरती घाबरली होती......कपाळावर ब-यापैकी घाम जमा झाला होता...मी सापड्ल्यावर मला जवळ घेण्यांत आलं...पटापटा मुके घेण्यात आले..

                           ''माझं ११ महिण्यांचं पोरंगं.. ..  नेहमीसारंखं त्याला किचनमध्ये घेऊन मी काम करत होते....हा माझ्या पाठीमागेच खेळ्त होता...आणि तव्यावरची पोळी परतेपर्यत नजर चुकली आणि हा गायब झाला...'' आई शेजारच्या काकूंना कौतुकाने सांगत होती...

                                ''आणि वॉशिंग मशिनमधे काय करत होतास रे लबाडा...?'' माझ्याकडे वळून तिने असं काय ऐटित प्रश्न विचारला जसं काय मी तिला उत्तर देणार होतो...

                              मग काय अंगवळणी पड्ल्यासारखं आमचं फोटोसेशन झालं...मग आम्हीही गड सर करून विजयी झालेल्या महाराजांसारख्या भरपूर पोजेस दिल्या.....असे माझे सगळेच पहिले क्षण आईने आपल्या डोळ्यांत आणि कॅमे-यात कैद केले आहेत....



                               थोड्क्यात काय अशी मस्त मस्त होती आमची वॉशिग मशिन यात्रा....!!!




रविवार, २४ जुलै, २०११

एका मनाचे अंतरंग...!!!

'' शुभ प्रभात...''

'' काय गं आज सकाळी सकाळी फोन..''

''आज मी खूप आनंदात आहे...''

''नेहमीसारखं...तूझं ना त्या लहानग्या चिमणीसारंखं आहे बघ...ईच्छा लहान आणि त्या पूर्ण झाल्यावर होणारा आनंद क्षणभंगूर....''

''अगं आज ईच्छाही मोठी होती ...आणि होणारा आनंद एवढा मोठा की तो मला आयुष्यभर पुरवायचा आहे..''

'' असं काय झालंय..?''

''तू घरी आहेस का आज...?"

''हो... नवरा गेलाय पूण्याला...बच्चू गेलाय त्याच्या मामाकडे...सो दिवसभर्.. मी अ‍ॅण्ड माय अ‍ॅनिमेटेड वर्ल्ड वेळ मिळालाच तर बझ्झ आणि माझी शेती...म्हणजे वेळच वेळ आहे.."

''ठीकाय मग ..मी दुपारी येते..''

''चालेल बाय..''

                  अख्खी दुपार टळ्ली तरी बयेचा पत्ता नाही...माझा मात्र विचार करून करून जीव सुखत चालला होता..फक्त तिचाच विचार मनात..तिचाच नाही...तिच्याशी संबधित सगळ्यांचा..मनाचं कवाड उघडलं..आणि पटापटा माणसं बाहेर पडावी तसे रंग बाहेर पडले..क्षणभरासाठी वाटलं..एकमेकांवर आदळतील आता हे..पण नशीब तसं काही झालं नाही..सगळे एका रांगेत जाऊन उभे राहिले..गुलाबी रंग तीचा...काळा रंग त्याचा...आणि पांढरा रंग तिच्या नव-याचा...मग मुलांनीही अनुक्रमे पिवळा आणि निळा रंग वाटून घेतले...गुलाबी रंग स्वतःसारखाच गुलाबी...स्वतःच्याच विश्वात रमणारा आणि असं असुनही दुस-यांत सहज मिसळून जाणारा...पण का इतका थरथरत होता...आनंदाने की दु:खाने...?

                   काळा रंग अंधाराचा...अमावस्येचा...पण तितकाच तेजस्वी.. ह्ट्टी...कुठल्याही रंगात कितीही मिसळायचा ठरवला तरीही स्वतःचं अस्तित्व न सोड्णारा..सगळीकडे आपली छाप सोडणारा...पांढरा रंग प्रकाशाचा...शुभ्र...तेजपुंज...श्रीमंतीचं भोवताली वलय असणारा...सगळ्यात मिसळ्लोय असं वरवर दाखवणारा... नाहीतर मूळ रंगालाही नकळत आपल्याबरोबर घेऊन जाणारा...त्याचं स्वतःचं त्याला आपलं वाट्णारं अस्तित्व धोक्यात आणण्याइतकं त्याच्यात मिसळून जाणारा...पिवळा अणि निळा रंग..आपल्याच विश्वात खेळ्णारे...खोडकर तितकेच निरागस...बाहेरच्या क्रूर रंगाचा अनुभव नसणारे.. निष्पाप...हे सगळे रंग माझ्याभोवती काय करत आहेत..?..कसले खेळ खेळत आहेत हे..?...आता ह्या सगळ्यांनी मधे काहीतरी ठेऊन त्याच्याभोवती फेर धरायला सुरवात केली...काय होतं बरं ते...माझं मन.. माझं हॄदय..माझा मेंदू...काही कळेना...पण मी पूर्णपणे त्या रंगाच्या ताब्यात होते...पाठशिवणीचा खेळ सुरू झाला आता...पांढरा रंग गुलाबी रंगाच्या मागे आणि गुलाबी रंग काळ्या रंगाच्या मागे...आणि काळा रंग कसल्यातरी ध्यानस्थ मुद्रेत...पण तो तिला सापड्त का नव्हता...?...गुलाबी रंग आता आपला मूळ रंग सोडायला लागला...स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठीची धडपड...पून्हा एकदा तळ्मळ...आणि माझा जीव गुदमरायला लागला...कुणीतरी माझ्या छाताडावर बसुन गळा दाबतंय...मला उंचावरून कुणीतरी फेकुन देतय..मी ओरडतेय...मी जागी झालेय का?...पण मी कुठे आहे..? समोरचे सगळे रंग ह्वेत विरून जातायेत हळुह्ळु...सर्वांग घामानं डबडबलेलं...स्वप्नात होते तर मी...

डोअरबेल वाजतेय.. दुपार झाली वाटतं बयेची...तर दारात पोलिस उभे..

''ह्या बाईला तूम्ही ओळखता...?''

डोळ्यासमोरचा फोटो दिसेनासा झाला...

''ह्या बाईनी ट्रेन मधून उडी मारुन आत्महत्या केलीय..ह्याच्यां मोबाईलवर शेवट्चा कॉल तुमचा होता....''

मला काहीच कळत नव्हतं.....समोर सगळा गुलाबी रंग पसरलेला...स्वतंत्र झालेला....

शेवटी ती आयुष्यभरासाठी सुखी झाली.....



शनिवार, १९ मार्च, २०११

राक्षसी वंश....??

                    ''सॉरी मि.समीर....आम्ही दोघांनाही वाचवू शकलो नाही''

                      काय सांगतोय हा डॉक्टर्...सफेद कोट घातला म्हणजे काय हाच ठरवणार का कोण किती जगणार्...मी आहे गं करूणा...का डोळे मिटलेस...आत्ता तर कुठे तुला बघायला लागलोय मी...असं नको करूस गं...करूणा...प्लिज मला सोडुन जाउ नकोस...मी नाही राहू शकत तूझ्याशिवाय...कुठे निघालीस तू..माझं बाळ.. नका घेउन जाउ त्याला....?

                  प्लीज करूणा...

                   माझ्या तोंडातून नकळत येणारी लाळ पुसायला कंटाळ्लीस का गं...?...एका झटक्यात एवढं मोठं शरीर आडवं झालं....चारी कोने चीत...शरीरंच आपलं राहिलं नाही तर लढणार कशाच्या बळावर...?..माझा अंहकार....माझ्यासारखाच स्वार्थी...लूळ्या पडलेल्या शरीराची पटकन साथ सोडून दिली...पण आता उपयोग काय...आता बोलताच येत नव्हतं...मनातलं तूला सांगताच येत नव्हतं...तूही काही बोलत नव्हतीस.. निर्विकार...तू अशी नव्ह्तीस कधी..केवढं बोलायचीस...माझं लक्ष नसायचं तेव्हा...पण आता तूझा एकच शब्द ऐकायला आसुसलोय गं मी...मी काय दिलं तूला..नुसतं दु:खं..मनःस्ताप...तू मात्र फक्त माझ्यासाठी जगत राहलीस...तूझ्या सुखाच्या आड आलो मी नेहमी...आणि तू मात्र सतत माझं सुख शोधत होतीस...

                 ''आपल्याला बाबा आता झेपत नाही...वय झालं..'' असं म्हणत आई गेली ती परत आलीच नाही...दादा तर दुरुनच उभं राहुन बघुन गेला... हाच सांगत होता गं महिण्यापूर्वी...''बायकोला जास्त डोक्यावर बसवु नकोस...पायातली वहाण पायातच बरी...'' त्याचीच री ओढत आई म्हणाली होती..''पाठीमागुन आलेलं कुत्रं ते...त्याला कुठं ठेवायचं ते तुझं तू बघ बाबा...''....पण त्यावेळी घडलं होतंही तसंच काहीतरी विचित्र...माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली होतीस तू...माझ्या अहंच्या फण्याला तूझा केविलवाणा चेहरा दिसलाच नाही...तू विणवण्या करत होतीस...''नको हो आपल्याला दूसरं मुल...मला खूप त्रास होतो हो...डॉ. नी काय सांगितलं लक्षात आहे ना...त्यापेक्षा आपण एखाद्या मुलाला दत्तक घेऊया ना...''

                  मी म्हणालो...'' पहिली मुलगी झालेय...दुसरा मुलगाच हवा...आणि दत्तक कशाला...आपण काय सालं वाझोंटे आहोत काय..?''

                 मी वाझोंटाच होतो गं...भावनेचा वाझोंटा....पैशाचा माज आला होता मला...तूही कमावयचीस...वास्तविक घरातलं सगळं तूच बघायचीस..मी मात्र त्या स्वार्थी भावाच्या घशात सगळं घालत राहिलो...तू एकदा जाणिवही करून दिलीस...पण मला वाट्लं तू आम्हां दोघां भावांना वेगळं करायला निघालीस..तूझा आणि पदरातल्या सईचाही मी विचार केला नाही...तू मात्र घर चालवलंस सगळं...कधी कुणाला काही कमी पडू दिलं नाहिस...सगळंच कसं जमायचं तूला...आज अंथरूणावर पडल्या पडल्या कौतुक वाटतंय तूझं...आज बोलायचं आहे गं तुझ्याशी...खूप बोलायचंय..मझा लॅपटॉप..क्रिकेटची मॅच...मित्र...सगळं सोडून फक्त तूझ्याशी बोलायचंय...आठवतंय मला...सई झाली तेव्हा तूला किती आनंद झाला होता...आईने तर मुलगी झाली म्ह्ट्ल्यावर बाळाचा चेहरा देखील पाहला नव्हता कित्येक दिवस...मी सुद्धा नाराजच होतो...पण सई तूझ्यासारखीच गोड...कधी ओढ लागली तीची कळलंच नाही...पण तरीही एक मुलगा हवा होता...वंश चालवायला कुणीतरी...तूही एकुलती एकच होतीस ना गं आपल्या आई बाबांची...तू माझा वंशच तर वाढवत होतीस...

                  मी तूला कधी समजूनच घेऊ शकलो नाही..तूझं बाळंतपण भलतं जड....कडक डोहाळे लागले होते तूला...सईच्या वेळी डॉ. नी सांगितलं होतं...पुन्हा चान्स घेऊ नका...पुढ्च्या वेळी कदाचित बाळ आणि आई दोघेही वाचणार नाहीत...पण मी तूझं कधीच ऐकलं नाही...त्या भयाण रात्री तूला झोपेचं औषध देऊन...तू कसलाही विरोध केला नाहीस..खरं तर तुझ्या विरोधाला मी कधी जुमानलंच नाही..कारण तू तो शुद्धीत असतानाही कधी केला नाहीस...तू का अशी होतीस...तूला जेव्हा कळलं की तू पुन्हा एकदा आई होणार आहेस...त्यादिवशी शेवटंचं बोललीस माझ्याशी...ते तूझे शब्द्...आजही रात्रीचं मला झोपू देत नाहीत...तू म्हणालीस...'' समीर हे तुम्ही योग्य केलं नाहीत..माझ्या मातृत्वाबरोबर खेळलात तुम्ही...मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही...'' त्यानंतर तू कधीच बोलली नाहीस...मी खचलो...त्यातच दादाने प्रॉपर्टीचे पेपर पाठवले...आता सगळं त्याचं होतं...पाठीत खंजिर खुपसला..स्वतःच्या सख्या भावानं..माझ्या नकळत....तूझ्या सख्या नव-यानं तूझ्या कुशीत खुपसला तसा..तूला नकळत...खरचं गं मी तूझा अपराधी आहे गं...

                   कामात लक्ष लागेना त्या दिवसापासुन...या सगळ्या विचारातच गाडीवरचा ताबा सुटला...आणि...डोळ्यांना काही दिसेना...शरीरात काहीतरी बिनसल्याची जाणीव....

                   ''मायनर पॅरालिसिस..'' डॉ. चे शब्द कानात घुमत राहिले...तू मात्र शांत होतीस...सई सारखं माझंही सगळं करायचीस...लहान बाळ झालो होतो ना मी तूझा....तूझं वाढतं पोट बघितलं की स्वतःच्या गुन्ह्याची जाणीव व्हायची...तूला प्रसव वेदना होत होत्या तेव्हा...बाहेर व्हीलचेअरवर बसुन अस्वस्थ वाटत होतं....मी तूला या वेदना दिल्या होत्या तूला नको असतानाही...मनातल्या मनात...प्रार्थना चालू होती...देवा सोड्व तीला...सगळ्या वेदंनातून सोडव माझ्या करूणेला....रक्षण कर तीचं...

                     आणि देवाने खरंच सोडवलं तूला सगळ्या वेदनांतून...तूझं रक्षण केलं माझ्यासारख्या राक्षसापासुन...पण आता माझा वंश कोण चालवणार....माझी बछडी...माझी सई...माझा वंश पुढे चालवणार....माझा वंश....

....माझा राक्षसी वंश...???



सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

पिवळ्या जगात...!!!





नेहमी व्हॅलेन्टाईन डे ला त्याच्यासाठी एक पत्र लिहिते...आजही लिहलं आहे...


प्रिय....,

               व्हॅलेन्टाईन डे येतो आणि तू मला येलो रोझेस सकट आठवतोस... यादिवशी एकमेकांना फक्त पाहण्यासाठी आपण तडफडायचो...

                  बरेच दिवसांचा अबोला आज संपवावासा वाटतोय...व्हॅलेन्टाईन डे एक निमित्त्...तूझ्याशी बोलायचंय..आज तुझीच परवानगी मागण्यासाठी पत्र लिहत आहे...


                 खूप प्रेम केलं आपण एकमेकांवर..पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू खूप आकडू वाट्लास...फर्स्ट इम्प्रेशन इझ लास्ट इम्प्रेशन..मारे लोक कितीहि बोंबा मारूदेत....लोकांच्या अगदी विरूद्ध अनुभव आहे माझा या फर्स्ट साईट इम्प्रेशनचा...फर्स्ट इम्प्रेशन इझ नॉट लास्ट इम्प्रेशन...तू त्यानतंर कधीच आकडू वाटला नाहिस...एकमेकांची ओळख झाली..मैत्री झाली..पण सुरवातीला आपण खूप भांडायचो ना रे..?..मागच्या जन्माच्या देणेकरासारखं...प्रेमावरून नेहमी भांडायचो...आता ते आठवलं तरी हसायला येतं..तू म्हणायचास प्रेम वगैरे काही नसतं..आणि मी प्रेमाचा खूप अनुभव असल्यासारखं म्हणायचे..तू प्रेमात पडलास कि समजेल तूला....कॉलेजमधले ते गुलाबी दिवस लवकरच संपले...तू जॉबला लागलास..आणि मीही...तरीही आपण वेळ काढून भेटायचो...तूझी गाणी..तूझी नाट्यसंगीतं..खरंच परत येतील का रे ते दिवस...?

                तू तूझ्या गर्लफ्रेंन्ड्नी दिलेल्या चॉकलेट्चं रॅपर जसं जपुन ठेवलंस तसं मीही तू दिलेलं पिवळं गुलाब अजुन जपुन ठेवलंय..तूझ्या प्रेमासारंखं सुखलंय म्हणा ते ही...!! पण माझ्या मनात अजुनही ते तितकंच टवटवीत आहे..आजही...!!!

                असो..तर पत्र लिहणं आपल्या प्रेमाचा एक मोठा भाग होता.. नेहमी एकमेकांना पत्र लिहायचो आपण...कधी रुसवा, राग (जो नेहमी मलाच यायचा..), कधी भांडण बरंच काही असायचं माझ्या पत्रामधे...आणि तूझी पत्रं नुसती प्रेमाने भरलेली असायची..आणि माझ्या स्तुतीने...!!

                   तूला कसं एवढं छान सुचायचं... हे कोडं मला आजही पडतं...तू आजही तितकंच छान लिहत असशील..मला खात्री आहे...पण ते माझ्यासाठी नसेल एवढीच खंत आहे...

                 तूला आठवतं का रे..सगळंच...पैसे नसताना एका वडापाववर अख्खा दिवस घालवायचो आपण...ती वरळीची वैशाली मधली मिसळ...आज कुठे आणि काय काय खात असते मी पण त्या वडापावची चव येत नाही रे त्या पाच तारे लावलेल्या हॉटेलच्या जेवणाला...दिवसभर नुसते उन्हात भटकायचो...बसला पैसे नसायचे म्हणुन चालत फिरायचो...खरंच किती वेडेपणा करायचो ना आपण..कमावायलो लागलो आणि सगळं संपलं...उन्हात फिरणं आणि चालणं सुद्धा..

                   आपला पहिला मुव्ही आठवतोय तूला...लेक्चर बंक करून बघितलेला...माझा हात मी तूझ्या हातावर ठेवलेला..तू तर थंड पडलेलास...किती निरागस वाटून गेलास त्यावेळी...म्हणालास मी पहिल्यांदाच आलोय एखाद्या मुलीसोबत मुव्ही बघायला...कितीतरी आत्मविश्वास वाढला होता तूझा, मला पहिल्यांदा मिठीत घेतलंस तेव्हा..तूझा स्पर्श अंगावर शहारे उठवत होता..केवढी उबदार होती तूझी मिठी...आजही तितकीच हवीहवीशी वाटणारी..आधार देणारी...अंगावर रोमांच उभी करणारी...आठवून बघ..शेवटचं कधी मिठीत घेतलं होतंस मला..?

                 आपल्या दोघांचा आवडता पाऊस..समुद्र..गाणी..पावसात भिजताना...समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकताना...आपल्या दोघांची गाणी गुणगुणताना...तू आठवतोस...आठवत राहतोस....मला हसवण्यासाठी किती उचापती करायचास तू...? रागावल्यावर कित्ती वेळा सॉरी बोलायचास...मी हसेपर्यत माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत राहायचास..तू मला खूप आवडायचास तेव्हा...माझी सततची बड्बड ऐकून तू कंटाळ्लास ना रे..?

                खूप प्रेम करतोस माझ्यावर माहितेय मला...पण हा अबोला मिटवून एकदा तरी सांगून बघ...तूझ्या सो कोल्ड कॉर्पोरेट लाईफ मधुन माझ्यासाठी थोडासा वेळ काढशील का?...थोडासा जुना तू हवा आहेस मला...मनापासुन खळखळून हसणारा...

मी तूझ्यावर खूप प्रेम करते...

तुझ्या सोबतीशिवाय...

काहीच शक्य नाही बघ..!!

तू,

तुझं आयुष्य

आणि

तुझ्या अस्तित्वाचा

एकेक क्षण..

ह्यातच माझं अवघं आयुष्य सामावलंय...!!!

चल ना पुन्हा एकदा त्या आपल्या पिवळ्या जगात...!!!

                                                                                       
                                                                                तुझीच आणि फक्त तुझीच..,



शनिवार, २२ जानेवारी, २०११

रांग..!!!



                 रांग हा शब्द काहि तुम्हांला आम्हांला नविन नाही...लहानपणी मला मुग्यांची रांग बघायला खूप आवडायचं...एकापाठोपाठ चालणा-या मुंग्या..त्यातल्या एकीलाही रांग सोडून दूसरीकडे जाण्याचा मोह होत नसावा बहुतेक्..किंवा तेव्ह्ढं धाड्स नसावं बहुदा...

                असो तर आपल्यापैकी रोज कुणीतरी कुठल्या ना कुठल्या रांगेत उभा असतो...तसचं मीही काल महाराष्ट्र राज्य विदयुत नियामक मंडळाच्या केद्रांवर आमच्या घराचं नेहमीसारखं जास्त आलेलं विद्युत देयक भरणा करण्यासाठी रांगेत उभी होते..अहो म्ह्णजे एम्.एस्.ई.बी. चं लाईट बील भरण्यासाठी रांगेत उभी होते..

               तर झालं काय..पुढे फक्त दोघेचजण..मनातल्या मनात आनंदाचा लाडू फुटला..आता आपलं काम लवकर होणार...पण ते माझ्या पुढचे दोघे जण हातात बरीचशी बीलं घेऊन उभे होते..पहिल्याच्या हातात १० बीलं तर दुस-याच्या हातात ७ बीलं...मनातला लाडू पोटात जाण्याआधीच घशात अडकला...

               शेजा-याची मदत करणं हा चांगला गुण आहे पण एकदम १० जणांची बिलं भरायला आणायची..माझ्या डोक्यावरच्या उन्हाबरोबर माझ्या पाठची रांगही वाढायला लागली..आणि माझा आधीच तापलेला पारा त्यांच्या हातातली बीलं बघुन अजुनच चढला..मी आधी थोडं नरमाईने घ्यायचं ठरवलं..रांगेतल्या पुढ्च्या गृहस्थाना म्ह्ट्लं..

''एवढी बीलं तुमची आहेत का...काका..?" (शेवटच्या काका शब्दावर जरा जास्त जोर..)

काका म्हटल्यावर ते गृहस्थ माझ्याकडे एकदम रागाने बघत म्हणाले..

''शेजा-यांची आहेत..''

''मग तुम्ही का आलात भरायला..?'' (माझा आपला वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखा निरागस प्रश्न..)

''त्यांना वेळ नव्हता..'' (तेवढंच उद्धट उत्तर...)

''तुमच्याकडे भरपुर वेळ आहे वाटतं..?'' (अतिउद्धट प्रश्न..)

''तुम्हांला काय करायचं आहे..?" (आता खरोखर काका रागावले..)

''अरे तुमच्याकडे भरपुर वेळ असेल..शेजा-यांची बीलं भरायला...मला पण बील भरायचं आहे..ते पण फक्त स्वतःच्या घरचं...'' (माझ्या सरळसोट उत्तराला घाबरले असावे बहुतेक...)

''मग मी काय इथे माश्या मारायला उभा राहिलोय..?'' (माझ्या गैरसमजाचा अक्षरशः फडशा..)

''मग एक बील भरा आणि पुन्हा रांगेत जा पाठिमागे...आणि मारा तुमच्या माशा..म्ह्णजे शेजां-याची बीलं भरा...'' (आता जरा जास्त मोठा आवाज....अहं दुखावला ना माझा...)

               मला मनातल्या मनात शिव्या घालत एक बील भरून शेजारधर्म निभावणारे काका परत रांगेत जाउन उभे राहीले..मी मात्र रांगेतल्या लोकांच्या कौतुकाच्या नजरा पाठीवर झेलत पुढे सरसावले...लोकं पुटपुटत होती...

'' बरं झालं..असंच पाहिजे..प्रामाणिकपणाच्या शाळा उघडल्या पाहिजे आता...सगळे मेले घुसखोर..''

               मला या कल्पनेची गमंतच वाटली...प्रामाणिकपणाच्या शाळा..खरंच असा प्रामाणिकपणा शिकवून येईल का कुणाला... शाळेतुन बाहेर पडणा-या मुलाचा निकाल कसा असेल..७०% प्रामाणिकपणा...किंवा नापास विद्यार्थी... अप्रामाणिक...

               असा टक्क्यावर नसतो प्रामाणिकपणा..एकतर तो असतो किंवा नसतो..पण लोकं स्वतःच्या मनाशी तरी प्रामाणिक असतात का? चुकीचं वागताना त्यांचं मन त्यांना डाफरत नसावं बहुतेक...

               बीलं भरून घरी निघाले तर सोसायटीतले नुकतेच निवृत्त झालेले काका भेटले...यांच्यासमोर सतत एकच प्रश्न असतो..वेळ कसा घालवावा...मला रस्त्यातच गाठुन माझ्याशी बदलत्या वातावरणावर चर्चा करायला लागले...

               रांगेत उभं राहून आपला वेळ वाया जाउ नये म्हणुन धडपड करणारी माणसं एका बाजुला..आणि आपला वेळ जात नाही म्हणून रस्त्यात उभं करून तासन् तास वायफळ विषयावर गप्पा मारणारी माणसं एका बाजुला...दोघांचीही संगत वाईट..एक आपली मनशांती खाणार..आणि दुसरा आपला वेळ खाणार...

संध्याकाळी हा सगळा किस्सा नव-याला सांगितला तर त्याचं काहितरी तिसरंच मत...

'' नाहीतरी तुला कुणाशीतरी भांडायचंच असतं..आज मी नाहीतर तो रांगेतला माणुस सापडला तुझ्या कचाट्यात...बिच्चारा...''

''अरे पण तो चुकीचंच वागत होता नाही का?"

''हो गं माझे राणी तो चुकीचंच वागत होता...पण तू का आपली एनर्जी वाया घालवतेस..? जस्ट कुल...''

''अरे असं कसं ..दुपारच्या कडक उन्हात तुझ्या अंगावर कुणीतरी गरम पाणी ओतत असेल तर आपण मात्र फ्रिजमध्ये आहोत अशी कल्पना करुन गप्प राहायचं...मला तर हा तुझा कुल ऑप्शन पक्का फुल वाटतो बुवा...''

''कसले शब्दाचे खेळ खेळतेस..तुझ्या या छोट्या छोट्या गोष्टी सोड..माझ्यासमोर एक मोठा प्रश्न आहे सध्या..''

''आता काय नविन उपद्व्याप केलास बाबा...?''

''आपल्या नविन घराची डिल बारगळली गं...अगं तो घरमालक चक्क १० लाख ब्लॅक मनी मागतोय...''

''हे ब्लॅक मनी कुठल्या शेतात उगवतं रे बाबा..?''

''तूला ब्लॅक मनी माहित नाही..तू नक्की सरकारी खात्यातच नोकरीला आहेस ना..?''

''अरे माझ्या सोन्या...खरंच माहीत नाही रे..''

''अगं ब्लॅक मनी म्हणजे पोहच पावती शिवाय जे पैसे पोहचते केले जातात ते..थोडक्यात जगाला अंधारात ठेउन दिलेले पैसे..तुझ्या सरकारी भाषेत 'टेबलाखालुन दिलेले पैसे..'...''

''ओके ओके..पण मग त्याला एवढे ब्लॅक मनी द्यायला कुणाला परवडेल...?...मला वाटत नाही त्याचा फ्लॅट विकला जाईल...''

''तुझं नाव मंदाकिनी ठेवायला हवं होतं तुझ्या आई-वडिलांनी...मंदच आहेस तू...रांग लागलेय त्याचा फ्लॅट घेण्यासाठी...''

             मी मख्खपणे त्याच्याकडे पाहत राहते..त्याच्या डोळ्यात दोन भाव एकत्र दिसतात मला..एक चीड आणि दुसरी हतबलता...दोघीचांही त्याच्या मनात गोंधळ चालला असावा..चीड कशाची तर आपल्याकडे ब्लॅक मनी द्यायला मनीच नसल्याची...आणि हतबलता कशाची तर असे अंधारात पैसे देण्याच्या विरुद्ध असणा-या संस्कांराची...

त्याचे शब्द कानात घुमत राहिले..

''रांग लागलेय त्याचा फ्लॅट घेण्यासाठी..''

                खरं सांगू तर या रांगाच चुकीच्या...वरवर वेगळ्या दिसणा-या पण आतुन फक्त दोनच प्रकारच्या...प्रामाणिकपणा असणा-यांच्या आणि प्रामाणिकपणा नसणा-यांच्या...आपण कुठे उभं राहायचं ते आपणच ठरवायचं...

नाहितर सरळ सरळ मुंग्यासारंखं वागायचं ..पुढचा चाललाय ना त्याच्या मागे चालत राहायचं...

पण कमीत कमी मेंदू असणारा आणि विचार करता येण्यासारख्या माणसाला 'माणुस' या स्वतःच्या नावाला तरी जागलं पाहिजे...

शेवटी निवडलेली रांग कोणती ते महत्वाचं...!!!











शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

स्वागत...!

माझ्या ब्लॉगर्स मित्र-मैत्रीणीना येणा-या वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा..!

जाणा-या वर्षात बरेच नविन सवंगडी माझ्या फ्रेंड लिस्ट मधे जन्माला आले.....त्या सगळयांचं स्वागत...!
बरेच ब्लॉग वाचले..काहि आवडले..तर काहींचा नुस्ता इमोशनल अत्याचार..

असो..आपण चांगलं बरोबर घेउन जावं....एका मित्राचा ब्लॉग वाचल्यावर आपलाही ब्लॉग असावा..आपणही काहितरी लिहावं, असं वाटलं..म्हणुन ब्लॉग सुरू केला..पण लिहायला वेळच मिळेना..मग योगायोगाने मिळालेल्या सुट्टीचा उपयोग करायचं ठरवलं..आणि मग जवळपास एकाद वर्षानं लिहायला सुरूवात केली..ज्यांनी माझ्या पोस्ट वाचल्या..मला सहन केलं..माझ्या पोस्ट्वर प्रतिक्रिया दिल्या..त्यांचे सगळ्यांचे आभार..!

पहील्यांदा फक्त वाचावं असं वाटलं..ब्लॉग वाचल्यानंतर मलाही काही ब्लॉग आवड्ले...या ब्लॉगर्स जगतातील बापांना माझा सलाम..यांना वाचल्यानंतर जाणवलं... आपण प्रचंड मोठ्या सागरात उडी मारली आहे..इथे फक्त पोहता येउन चालत नाही..रोज नविन सूर मारावे लागतात..या पट्टीच्या पोहणा-यामधे माझा निभाव लागणं कठीण आहे..पण मला खात्री आहे..माझ्या मित्र-मैत्रीणीच्या भेटींचा व प्रतिक्रियांचा ऑक्सिजन मास्क मला नक्किच तारून नेईल...

काही सगळ्यांना आवड्तील असे ब्लॉग मला नमुद केल्याशिवाय राहवलं नाही...त्याच्यांसाठी खास ही पोस्ट..

www.restiscrime.blogspot.com अनघाताई :- लिखाणशैली उत्तम..रोज काहीतरी नविन देण्याचा प्रयत्न..मला अनघाताईची सगळीच बाळं आवड्तात..पण सगळ्यात जास्त आवड्लेलं ते म्हणजे 'सुरंवंट'...वाचल्यानंतर पहील्यांदा माझ्या पाळ्ण्यात झोपलेल्या दोन महीण्यांच्या बाळाकडे लक्ष गेलं..माझं छोटंसं सुरंवंट..

वेदना देउन गेलेली पोस्ट 'आवराआवर' ..बाकी सगळी बाळंही गोडंस...

** पकंज भटक्या..तुझ्या भटकंतीला या भटकभवानी कडून शुभेच्छा!

** www.deepakparulekar.blogspot.com / www.indrayanee.blogspot.com दीपक परुळेकर:- मनाचं बांधकाम आणि इंद्रायणी दोन्हीही छानच..पैलतीर, निशिगंध मस्तच! चगोंच्या चारोळ्या डायरीत लिहणारं पोरंगं मस्त कविता करतय...लगे रहो..

** www.harkatnay.com वटवट सत्यवान तुझे खादाडीचे प्रयोग आवडले आणि तुझी वटवटसुद्धा

** अतुल राणे :-मृगजळ मस्त आहे कवितेच्या विश्वातला राजा..

** www.manatale.wordpress.com अनिकेत :-मराठी भुंगा तुझ्या सगळ्या पोस्ट अप्रतिम..

** www.davbindu.wordpress.com देवेन :-तुझी सध्याची पोस्ट 'पानिपत' खुप आवडली..खरंच पुस्तक वाचताना अंगावर काटा आला होता..

** www.suhasonline.wordpress.com सुहास झेले :-'ओढ नव्या जीवाची' अप्रतिम..

** www.canvaspaint.com सचिन (उथळे) पाटील :- तुझे स्केचस मस्त आहेत...

** www.aadityawrites.blogspot.com आदित्य बोलतोय आणि सगळे वाचत आहेत तुला सुचेल तसं आणि सुचेल ते

** www.gandhchaphyacha.blogspot.com सुषमेय :- चाफ्याचा गंध मस्त पसरलाय...

** www.sanjvel.blogspot.com आ़नंद काळे :- छान आहे ब्लॉग..

** www.arvindcollectionofmarathikavita.blogspot.com /  www.mazidayri.blogspot.com अरविंद अक्षतांचं चांदणं मस्त आहेत तुझ्या कविता आणि तुझी डायरीसुद्धा...!

तुम्ही सर्व खूप छान लिहीता..तुमच्या ब्लॉगशी जोडलेलं हे नातं येणा-या वर्षात अजुन बहरावं हीच प्रार्थना...



नविन वर्षाचं स्वागत जल्लोषात करा..!



२०११ तुझं स्वागत....!